सावित्री नदीच्या खाडीकिनारी आढळला तरुणाचा मृतदेह
मंडणगड :
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे सावित्री नदीच्या खाडीकिनारी एका ३९ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद व मृत अवस्थेत चिखलात मिळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या पूर्वी म्हाप्रळ गावाच्या हद्दीत सावित्री नदीच्या खाडीकिनारी असलेल्या मजीद अहमद मुकादम यांच्या प्लॉटजवळ चिखलात हा मृतदेह आढळला.
मृत व्यक्तीची ओळख विशाल महादेव सुतार (वय ३९, रा. तळोशी, ता. महाड, जि. रायगड) अशी पटली आहे. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक १५/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. विशाल सुतार यांचा मृत्यू नेमका कसा झाला, ते खाडीकिनारी कसे पोहोचले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.