खडपोली येथे अवजड ट्रकचा अपघात
कठड्याला धडकल्याने वाहतुकीला अडथळा; चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील खडपोली सुकाई मंदिराजवळील वळणावर प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत भरधाव वेगात अवजड ट्रक चालवून अपघात केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात एका ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी पिंपळी पूल पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबत काढलेल्या आदेशाची अवज्ञा करून या ट्रक चालकाने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केला. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राकेश संजय चव्हाण (वय २६, मूळ रा. शाहगड, आझमगढ, उत्तर प्रदेश) असे या ट्रक चालकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण उपविभागीय अधिकाऱ्यांनी जड वाहनांच्या वाहतुकीबाबत पर्यायी व्यवस्था जाहीर केली होती.
मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करत राकेश चव्हाण याने आपल्या ताब्यातील अवजड ट्रक (एमएच ०६ बीडी ०८३२) गाणे खडपोली ते पेढंबे ब्रिज असा भरधाव वेगात नेला. खडपोली सुकाई मंदिराजवळ एका वळणावर आल्यावर ट्रक नाल्याच्या कठड्याला धडकून अडकून पडला. या अपघातामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आणि तेथून प्रवास करणाऱ्या इतर लोकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सचिन आप्पासो कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २२३, २८१ आणि २८५ नुसार ट्रक चालक राकेश चव्हाण याच्या विरोधात रीतसर आदेशाची अवज्ञा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.