इनरव्हील रत्नागिरी मिडटाऊनतर्फे पोदार स्कूलमध्ये ‘स्पेस क्विझ’
राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी:
राष्ट्रीय अंतराळ दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेस क्विझ’ म्हणजेच अंतराळ विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची गोडी लागावी आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, या मुख्य उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेमध्ये अंतराळ विज्ञान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान मोहिमांशी संबंधित विविध रंजक व ज्ञानवर्धक प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. पोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने या प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदवत आपल्या अंतराळ विज्ञानातील ज्ञानाचे उत्तम प्रदर्शन केले.
स्पर्धेतील अटीतटीच्या फेऱ्यांनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये इरा औरंगाबादकर आणि श्रीयांश वाघाटे या जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. शर्विल राणे आणि समा होडेकर यांनी द्वितीय, तर सक्षम महाजन आणि भैरवी राणे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. सर्व विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेची पारितोषिके इनरव्हीलच्या सचिव डॉ. प्रियंका कांबळे यांनी आपले सासरे स्व. डॉ. पांडुरंग कांबळे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ प्रायोजित केली होती.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हील रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्ष सुवर्णा चौधरी, सेक्रेटरी डॉ. प्रियंका कांबळे, पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम आणि आर्वी मिस यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी इनरव्हीलच्या खजिनदार आशा सनगर, एडिटर सोनाली आयरे, शुभांगी तापेकर आणि तन्वी साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाविषयी कुतूहल निर्माण करणारा हा सोहळा अत्यंत आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.