चिपळूणमध्ये मगरीचा महिलेवर जीवघेणा हल्ला
१० वर्षांच्या चिमुकलीच्या धाडसामुळे वाचला आईचा जीव
चिपळूण: चिपळूण येथील वाशिष्ठी मुखेड येथील जगबुडी नदीत मगरींचा प्रचंड प्रमाणात वावर आहे. हा मगरींचाच वावर आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण शहराजवळील वालोपे येथे घडली आहे. सुदैवाने चिमुकलीच्या धाडसामुळे आईचे प्राण वाचले आहेत अन्यथा ‘वेळ आली होती, पण काळ आला नव्हता’ असाच मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर काल गुरुवारी सायंकाळी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय 35) यांच्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. त्याचवेळी हा प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचलं. त्यामुळे नंदिनी यांचा जीव वाचला. 10 वर्षांच्या लेकीनं दाखवलेलं धाडस कौतुकास्पद ठरलं असून तिच्यामुळे आईचा जीव वाचला आहे.
मगरीने नंदिनी यांच्या पायाचा जबड्यात पकड घेत त्यांना खोल पाण्याकडे ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यानं घाबरलेल्या नंदिनी यांनी आरडाओरड करत काठावरील मोठा दगड पकडला. आईला मगर पाण्यात ओढत असल्याचं लक्षात येताच त्यांची लेक स्वर्णी घाबरून न जाता तातडीनं आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचलं. या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. या घटनेत जखमी झालेल्या नंदिनी यांना तातडीनं कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनविभागाच्या पथकासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले, वनरक्षक रा. भा. गुंटे, लिपिक एस. ए. कलावंत आणि आरआरटी सदस्य अथर्व घाग यांनी रुग्णालयात जाऊन नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर देत वनविभाग त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. वन परिक्षेत्र अधिकारी गिरीजा देसाई यांनीही या सगळ्या घटनेची माहिती घेतली आहे नागरिकांनी नदीकिनारी जाताना काळजी व आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्यानं नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. नदीत पोहणं, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात जाणं टाळावं. तसेच लहान मुलांना नदीकाठावर अथवा पाण्यात जाऊ देऊ नये, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी सांगितलं. दरम्यान, संकटाच्या क्षणी आईचा जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या 10 वर्षीय स्वर्णीचं सर्वत्र कौतुक होत आहे.