‘अपना बाजार’ संस्थेतर्फे श्री छ. शिवाजी हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप
रत्नागिरी: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावत त्यांच्यातील कला, क्रीडा व शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित (बहुराज्य ग्राहक सहकारी संस्था) – अपना बाजार को-ऑप., रत्नागिरी यांच्या वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री छ. शिवाजी हायस्कूल, झाडगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कंपास पेट्या, वह्या व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था यांच्यातील सहकार्याचा आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.
या कार्यक्रमासाठी अपना बाजार संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रवींद्र इनामदार सर, जेएसडब्ल्यूचे जनरल मॅनेजर मा. श्री. अतुल करंदीकर, अपना बाजार संस्थेचे सदस्य मा. श्री. सचिन बारटक्के सर, मा. श्री. दिलीप नाचणकर तसेच श्री. यश जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. पाटील सर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. शाळेच्या वतीने अपना बाजार संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी मा. श्री. रवींद्र इनामदार सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अपना बाजार संस्थेची ध्येय-धोरणे व सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला व विविध सहशालेय उपक्रमांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध संस्था व व्यक्तींनी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यापुढेही अपना बाजार संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य व मदत करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. डी. पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अपना बाजार संस्थेच्या समाजोपयोगी कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही केवळ मदत नसून त्यांच्या स्वप्नांना आणि भविष्यातील वाटचालीला बळ देणारी कृती असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांना शिक्षणात अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानाची नवी साधने’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक स्वागत केले. सामाजिक उत्तरदायित्व जपत शैक्षणिक क्षेत्राला सहकार्य करणाऱ्या अपना बाजार संस्थेच्या या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे. ‘अपना बाजार’ संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले हे योगदान निश्चितच कौतुकास्पद असून, इतर संस्था व दानशूर व्यक्तींनाही अशा समाजोपयोगी कार्यासाठी प्रेरणा देणारे आहे.
या कार्यक्रमास श्री. सुतार सर, एम. डी. पाटील सर, एन. व्ही. जाधव सर, सौ. शितूत मॅडम, ए. ए. मंडले सर, श्री. सनगरे सर, श्री. पवार मामा तसेच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एच. पठाण सर यांनी प्रभावीपणे केले. सौ. शितूत मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपक्रमामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. तर एन. व्ही. जाधव सर यांनी उपस्थित मान्यवर, अपना बाजार संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.