चिपळुणातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे
लवकरच वाहतूक सुरू होण्याची शक्यता
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात लांबीच्या चिपळुणातील उड्डाणपुलावर अखेर स्लॅबचे काम पूर्णत्वास गेले. १.८४ किलोमीटर लांबी असलेल्या पुलावर तब्बल १८२ स्लॅब टाकले आहेत. महामार्ग चौपदरी असला, तरी भविष्यातील गरज ओळखून उड्डाणपूल २५ मीटर रूंदीचा सहापदरी केला आहे. बुधवारी (ता. १२) या उड्डाणपुलाचा अखेरचा स्लॅब पडल्याने उर्वरित कामांना वेग येणार आहे.
चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामात सुरवातीला काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. महामार्गालगतच्या पाईपलाईन, तुटलेल्या मोऱ्या दुरुस्त करण्यातच बराचसा कालावधी गेला. सुमारे चार वर्षांपूर्वी बहादूरशेखनाका येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच तो कोसळला होता. त्यानंतर उड्डाणपुलाच्या मूळ आराखडण्यात बदल करण्यात आला.
४० मीटर अंतरावरचे पिलर २० मीटरवर उभारण्याचे ठरले. त्यानंतर अतिरिक्त पिलर टाकण्यात आले; मात्र या कामात बराचसा कालावधी निघून गेला. अखेर यंत्रणा व कामगार वाढवून दोन वर्षांपूर्वी या कामाला जोमाने सुरवात करण्यात आली. त्याप्रमाणे उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले असून, बुधवारी शेवटच्या स्लॅब टाकण्यात आला. त्यामुळे आता या उड्डाणपुलाचा जोडरस्ता व अन्य कामांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
एकीकडे स्लॅबचे काम सुरू असतानाच जोडरस्त्याचे कामदेखील सुरू ठेवले होते. दोन्ही बाजूला जोडरस्त्याच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात जोडरस्त्याच्या भरावाला सुरवात होईल. त्याशिवाय प्रांत कार्यालयाशेजारी देखील भरावाचे मोठे काम शिल्लक आहे; मात्र या कामात पावसामुळे अडचणी येत असल्याने त्यास विलंब होत आहे.
गणेशोत्सवाचा मुहूर्त हुकणार
उड्डाणपुलावरील पथदीप, रंगकाम आणि डांबरीकरणाची कामे शिल्लक आहेत. भराव आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्येच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणेशोत्सवापूर्वी उड्डाणपूल खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे नियोजन होते; मात्र भरावाची कामे अपूर्ण असल्याने दिवाळीतच या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.