जि.प. शाळांमध्ये ‘ऑनलाईन अभ्यास’ देण्यावर बंदी
रत्नागिरीत जिल्हा परिषदेचा ऐतिहासिक निर्णय
रत्नागिरी :
गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये मोबाईलचे वाढलेले प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा परिषदेने एक धाडसी आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन अभ्यास’ देण्याची पद्धत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळापासून सुरू झालेली ऑनलाईन अभ्यासाची संस्कृती आता हद्दपार करून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पारंपरिक, पुस्तकी शिक्षणाकडे आणि पाठांतराकडे वळवण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे.
कोरोना साथीच्या काळात शाळा बंद असताना शिक्षणाची साखळी तुटू नये म्हणून ऑनलाईन अभ्यासाचा वापर सुरू करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा काळ संपल्यानंतरही शाळांमधून व्हॉट्सॲप ग्रुप, गुगल आणि विविध ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन गृहपाठ देण्याची प्रथा कायम राहिली. यामुळे अगदी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांच्या हातातही नियमितपणे मोबाईल येऊ लागले. अभ्यासाच्या बहाण्याने मोबाईल हातात घेतल्यानंतर मुले सोशल मीडिया, गेमिंग आणि अनावश्यक ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या आहारी जात असल्याचे दिसून आले. या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडणे, डोळ्यांचे विकार वाढणे आणि एकाग्रता कमी होणे अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी या वाढत्या मोबाईल संस्कृतीवर तीव्र चिंता व्यक्त केली. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठासाठी गुगलवर माहिती शोधायला सांगितली जाते, त्यामुळे विद्यार्थी स्वतःची बुद्धी न चालवता किंवा पाठ्यपुस्तक न उघडता थेट इंटरनेटवरून उत्तरे शोधून लिहून काढतात, ही बाब बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आणि विचार करण्याची सवय नष्ट होत चालली आहे. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने ऑनलाईन गृहपाठ देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा हा ठोस निर्णय घेतला.
या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आता जुन्या आणि पारंपरिक पद्धतीनुसारच गृहपाठ द्यावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकांचा वापर करावा लागेल. या निर्णयासोबतच जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पाया मजबूत करण्यासाठी एका जुन्या पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही घेतला आहे. शाळांमध्ये आता २ ते ३० पर्यंतचे पाढे सक्तीने पाठांतर करून घेण्यावर भर दिला जाणार आहे.
पूर्वीच्या काळात विद्यार्थी दररोज पाढे तोंडपाठ करायचे, ज्यामुळे त्यांचे गणित कच्चे राहत नसे. मात्र मोबाईल आणि कॅल्क्युलेटरच्या वाढत्या वापरामुळे ही पाठांतराची सवय पूर्णपणे मागे पडली होती. आता पुन्हा एकदा शाळांमध्ये पाड्यांचे सूर गुंजणार आहेत. या निर्णयाची केवळ कागदावर अंमलबजावणी न राहता ती प्रत्यक्ष वर्गापर्यंत पोहोचावी, यासाठी शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी स्वतः शाळांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. या भेटींदरम्यान वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर तपासले जाईल.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या या क्रांतिकारी निर्णयाचे पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींमधून जोरदार स्वागत होत आहे. मुलांच्या हातातून मोबाईल सुटून पुन्हा एकदा पुस्तके आणि वह्या येणार असल्याने मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम होईल आणि त्यांच्या आरोग्यावरील होणारा वाईट परिणाम टळेल, असा विश्वास सर्वस्तरातून व्यक्त केला जात आहे.