भरधाव क्रेटा कारच्या धडकेत कारचालक जखमी; चालक फरार
खेड भरेंगे नाका येथील घटना
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरेंगे नाका येथील शिवनेरी हॉटेलजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात फिर्यादी जखमी झाले असून, अपघात झाल्यानंतर चालक आपली कार न थांबवता घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी दिनेश परशुराम चव्हाण (वय ४७, रा. कर्टेल, ता. खेड) यांनी त्यांच्या ताब्यातील कार (क्र. MH 08 BE 9469) रिलायन्स पेट्रोल पंप येथून पेट्रोल भरून, मोरे फर्निचरकडून टर्न मारून मुंबई-गोवा महामार्गाने मुंबई ते गोवा जाणाऱ्या लेनने भरेंगे नाका येथील शिवनेरी हॉटेलजवळ आणली.
त्यावेळी मुंबईच्या दिशेने पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या क्रेटा कारच्या (क्र. MH 04 JB 5850) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, अविचाराने व अतिवेगात चालवले. त्याने फिर्यादीच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर आरोपी चालक घटनास्थळी न थांबता तिथून पसार झाला. या अपघातात फिर्यादी दिनेश परशुराम चव्हाण हे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी दिनेश परशुराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३२ वाजता खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) तसेच मोटार वाहन कायदा (मो.वा.का.) कलम १८४, १३४ (अ)(ब) नुसार आरोपी चालक दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय २४, रा. नरळेवस्ती खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.