रत्नागिरीतील ‘स्विगी गर्ल्स’चा ठाकरे सेनेकडून सन्मान
रत्नागिरी:
कोणतेही काम लहान-मोठे नसून महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहू शकतात, हेच रत्नागिरीतील ‘स्विगी गर्ल्स’ने आपल्या कष्टाने सिद्ध करून दाखवले आहे. भरधाव गाड्या, वाहतुकीची कोंडी आणि दिवसातील १२-१२ तास दुचाकीवरून सुरू असलेला प्रवास… अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या आणि कुटुंबाला भक्कम आधार देणाऱ्या या युवतींच्या जिद्दीचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.कोरोनाच्या भीषण संकटाच्या काळापासून या महिला डिलिव्हरी पार्टनर म्हणून अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करत आहेत. सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत अहोरात्र कष्ट उपसून त्या केवळ उदरनिर्वाह करत नाहीत, तर स्वतःच्या स्वाभिमानाची नवी ओळख निर्माण करत आहेत. रस्त्यावरील विविध धोके पत्करून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या 'स्विगी गर्ल्स'ची जिद्द इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.
युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना रत्नागिरी तालुका समन्वयक शेखर घोसाळे आणि शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन या युवतींचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले.
युवासेनेने घेतलेल्या या पुढाकारामुळे ‘स्विगी गर्ल्स’ अत्यंत भावुक झाल्या. “रोजच्या धावपळीत आणि संघर्षात आमच्या कार्याची दखल घेऊन असा गौरव केला जाईल, असे वाटले नव्हते. या सन्मानामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून, हा मान दिल्याबद्दल आम्ही जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत आणि संपूर्ण युवासेनेचे मनःपूर्वक आभार मानतो,” अशा भावना या महिलांनी व्यक्त केल्या.
महिला सक्षमीकरणाचा थेट आणि सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्वाभिमानी युवतींचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी येत्या काही दिवसांत त्यांचा विशेष ‘भव्य सत्कार समारंभ’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी दिली आहे.