पावसाचा कॉमबॅक; जिल्हाभरात मुसळधार पावसाच्या सरींवर सरी
रत्नागिरी
जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर दिसून आला. गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. दिवसभर पावसाच्या जोरदार सरींनी जिल्ह्याला झोडपून काढले. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत होती.
मागील दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी होता. दिवसभरात अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींव्यतिरिक्त इतरवेळी उन्हाचा कडाका असल्याने उकाड्यात वाढ झाली होती. मात्र गुरुवारी पहाटेपासून जिल्हाभरात पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला होता. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हाभरात दमदार पावसाने हजेरी लावली. खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळी बाहेर म्हणजेच 5.40 मिटर इतकी पातळी होती. पुढील चार जिल्ह्याला पावसाचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत पावसाच्या किरकोळ सरी कोसळण्याची शक्यता आहे.
पावसाच्या दमदार सरींनी बळीराजाला दिलासा दिला आहे. मध्यंतरी पावसाने पूर्णतः पाठ फिरवल्याने जिल्ह्यातील भातशेती पूर्णतः धोक्यात आली होती. अनेक ठिकाणच्या भातशेतीमध्ये जमिनीला भेगा पडल्याचे चित्र होते. मात्र गुरुवारी कोसळलेल्या दमदार पावसामुळे भातशेतीला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. मागील 24 तासात चिपळूण तालुक्यात 45.88 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात 49.50 मिमी, खेड 32.42 मिमी, दापोलीत 29.42 मिमी, राजापूर तालुक्यात 28 मिमी तर रत्नागिरीत अवघा 19.77 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.