संगमेश्वर किरबेटमध्ये गवारेड्यांचा धुडगूस
१४ शेतकऱ्यांच्या भातशेतीची नासधूस, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप
संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील किरबेट गावात गवारेड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी गवारेड्यांनी शेतात घुसून नुकतीच लावलेली भाताची रोपे खाऊन टाकली, तर अनेक ठिकाणी तुडवून शेतीचे प्रचंड नुकसान केले. यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक अडचणींचे नवे संकट उभे राहिले आहे.
यंदा पाऊस उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा खर्च करून पंपाच्या सहाय्याने भात लागवड करावी लागली. कर्ज काढून आणि मेहनत करून उभी केलेली शेती काही तासांत गवारेड्यांनी उद्ध्वस्त केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कृषी अधिकारी आणि कर्मचारी गावात क्वचितच येतात. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, मार्गदर्शन करणे किंवा नुकसानग्रस्तांची दखल घेणे याबाबत त्यांची भूमिका समाधानकारक नसल्याने किरबेटमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार नुकसान होऊनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासनाविरोधात संताप वाढत आहे.
या घटनेत राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, आनंत पांचाळ, शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे, सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे, प्रकाश जायगडे, महेश जायगडे, प्रकाश सुर्वे आणि महेंद्र लाखन या शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा किरबेट येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.