राजीवडा नाका येथे टेरेसवरून १.८५ लाखांची मच्छीमारी जाळी चोरी
रत्नागिरी:
शहरातील राजीवडा नाका परिसरात एका घराच्या टेरेसवर ठेवलेली तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीची मच्छीमारी जाळी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ एप्रिल ते १५ मे २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादी इम्रान कमरुद्दीन मुल्ला (रा. राजीवडा-निवखोल, रत्नागिरी) यांनी त्यांच्या मालकीची मच्छीमारीसाठी वापरण्यात येणारी जाळी सासरे मकबुल मोहम्मद मोतीवाले यांच्या राजीवडा नाका येथील घराच्या खुल्या टेरेसवर सुरक्षित ठेवली होती. काही दिवसांनी जाळीची पाहणी केली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे १ लाख ३५ हजार रुपये किमतीची लाल रंगाची, सुमारे ३०० किलो वजनाची पर्सनेट प्रकारातील नायलॉन धाग्याची मच्छीमारी जाळी तसेच ५० हजार रुपये किमतीची हिरव्या रंगाची, सुमारे ५०० किलो वजनाची नायलॉन जाळी असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे.
घटनेची खात्री झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांनी सोमवारी (ता. ३) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या आकाराची व वजनाची मच्छीमारी जाळी चोरी करण्यासाठी एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती संकलन तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे शहर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.