दापोलीत चालत्या एसटी बसमधून वाहक खाली कोसळल्याने खळबळ
चक्कर आल्यामुळे घडली दुर्घटना
दापोली: तालुक्यात बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. केळशीहून दापोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील वाहक आसूद बाग ते गिम्हवणे दरम्यान चालत्या बसमधून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहक बसच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन बसचा दरवाजा उघडताच ते थेट रस्त्यावर कोसळले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवाशांनी आरडाओरडा केला. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ बस थांबवली.
जखमी वाहकाला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या मदतीने तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
घटनेची माहिती मिळताच दापोली आगारातील कार्यशाळा अधीक्षक मुन्नाफभाई राजापकर, टी.आय. नाफाडे तसेच आगारातील अधिकारी, चालक आणि वाहक यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस केली.
दरम्यान, अचानक चक्कर आल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, नेमके कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे. जखमी वाहकाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सहकारी आणि प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.