तुटलेल्या विद्युतवाहीनीचा शॉक लागून २ गाईंचा मृत्यू
दापोली :- तालुक्यातील पिसई गावातील स्मशानभूमी परिसरात गुरे चरत असताना त्या परिसरात विद्युत वहिनी तुटून खाली पडलेली होती. दरम्यान चरायला सोडलेल्या गाई चरत याठिकाणी गेल्या असता शॉक लागून त्या मृत्युमुखी पडल्या. ही दुर्दैवी घटना दिनांक २८ जुलै मंगळवार रोजी सकाळी दहा वाजणेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिसई गावातील स्मशानभूमीजवळ गावातील रहिवासी श्री. नारायण भिकू मोरे हे गुरे चरवण्यासाठी घेऊन गेले होते. गुरे चरत असताना पुढे सरकत होती. त्याचवेळी दोन गाभण गाई मोठमोठ्याने ओरडू लागल्यामुळे जवळच असलेले मालक गाई ओरडतात का, हे पहाण्यासाठी गेले असता वीजेच्या खांबावरील एक तार तुटून खाली पडलेली दिसली. त्यावरच दोन्ही गाई मृत पावलेल्या दिसल्या. नशीब बलवत्तर म्हणून त्यानी हात लावला नाही. जवळ गेले होते पण हात लावण्याआधी त्यानी झालेली घटना गांधी दुकानवाले याना कथन केली. लगेचंच जवळच असलेले अजित येसरे यांनी डीपीवरील फ्यूज काढला व लाईन बंद केली.
यामध्ये गाभण गाई ह्या मृत पावल्या असून त्यांची किंमत सुमारे १५०००/- पर्यत असू शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाबत पिसई पोलीसपाटील, सरपंच, विद्युत वायरमन, वीज महावितरण अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. सदर घटनेचा पंचनामा केल्यानंतर व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्या गाई मालकांच्या ताब्यात देण्यात येतील. या दुःखद घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर दुःखाचे सावट पसरले आहे.