रत्नागिरीत मटका जुगारावर कारवाई
राधाकृष्ण टॉकीजजवळ सुरू असलेल्या जुगाराचा पर्दाफाश
रत्नागिरी: शहरात राधाकृष्ण टॉकीजच्या बाजूला एका टपरीच्या आडोशाला विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली आहे. २५ जुलै रोजी दुपारी १:२५ वाजता ही घटना घडली असून, या प्रकरणी २५ जुलै रोजी दुपारी ३:५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश दशरथ शेट्ये (वय ३८) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. अब्दुल गफार ईस्माईल वल्ली (वय ६५, रा. चांदेराई, ता. जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव असून तो स्वतःच्या ता्यात कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून गैरकायदेशीरपणे जुगार खेळ चालवत असताना मिळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण १,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये १,६६० रुपये रोख आणि १० रुपये किमतीची ६ इंच लांबीची मोजपट्टी व निळ्या शाईचे एक बॉलपेन जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.