कशेडी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी
चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खेड:
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी बोगद्याजवळ एका भरधाव गॅस टँकरने डिव्हायडरला धडक देऊन विरुद्ध लेनमध्ये पलटी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक प्रेम प्रकाश पटेल हा आपल्या ताब्यातील गॅस टँकर (क्र. MH 08 W 8368) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. वाहन चालवताना त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. भरधाव टँकर रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडक देऊन हायवेच्या पलीकडील गोवाकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. या भीषण अपघातात चालक प्रेम प्रकाश पटेल हा स्वतः किरकोळ जखमी झाला आहे.
या प्रकरणी २४ जुलै २०२६ रोजी रात्री १२:५३ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.