छ. शिवाजी हायस्कूल येथे सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव, रत्नागिरी येथे सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थनेने झाली. मुख्याध्यापक श्री. आनंदा पाटील यांनी उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन द्वारे सायबर सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी गोगटे जोगळेकर कॉलेजचे कंम्प्युटर सायन्स विभागाचे अनुष्का झगडे, पुर्वा सुर्वे, सृष्टी पाटील, अथर्व सावंत इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. सायबर सेल म्हणजे सायबर गुन्हे हाताळण्यासाठी आणि त्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक विशेष शाखा आहे. सायबर गुन्हे म्हणजे इंटरनेट, संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर करून केलेले गुन्हे. या गुन्ह्यांमध्ये फसवणूक, बदनामी, डेटा चोरी, आणि इतर अनेक गुन्हेगारी कृत्ये सामील असू शकतात.
सायबर सेल काय काम करते? सायबर गुन्ह्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? तुमचे पासवर्ड मजबूत ठेवा आणि ते नियमितपणे बदला. अपरिचित लोकांकडून आलेल्या ईमेल्स किंवा लिंक्सवर क्लिक करणे टाळा.
तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळा. तुमचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. तुम्ही ऑनलाइन खरेदी करत असल्यास, विश्वसनीय वेबसाइटचा वापर करा. तुमच्या बँकेच्या खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. जर तुमच्यासोबत सायबर गुन्हा घडला, तर काय करावे? तत्काळ पोलिसात तक्रार दाखल करा. तुम्ही राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर देखील तक्रार दाखल करू शकता. तुमच्या तक्रारीची नोंद झाल्यावर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल. तुम्ही तुमच्या तक्रारीचा पुढील तपास करण्यासाठी या क्रमांकाचा वापर करू शकता. अशी एक ना अनेक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सायबर क्राईम घडू नये म्हणून जनजागृतीसाठी रत्नागिरी शहरातील सायबर गुन्हे जे घडले आहेत, त्याचीही यावेळी माहिती देण्यात आली.
यासाठी रत्नागिरी पोलीस सायबर डिपार्टमेंट यांची मिळणारी मदत याचेही मार्गदर्शन याप्रसंगी देण्यात आले. सायबर सुरक्षा संदर्भात 1930 हा इमर्जन्सी नंबर ही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी अशोक सुतार, एम. डी. पाटील, नवनाथ जाधव, अमोल मंडले, गौरी शितूत, सैफुद्दीन पठाण, स्वप्नील सावंत, मंगेश सनगरे, लक्ष्मण पवार, राजेंद्र फगरे यांच्या समवेत इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. आनंददायी वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सैफुद्दिन पठाण यांनी केले तर आभार शिक्षीका गौरी शितूत यांनी मानले.