विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून कुटुंबावर हल्ला
वरवडे, खारवीवाडा येथील घटना
रत्नागिरी:
तालुक्यातील वरवडे, खारवीवाडा येथे गावातील लोकांविरोधात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून जमावाने एका कुटुंबावर हल्ला केला. घराचे दोन्ही दरवाजे तोडून आत घुसलेल्या या जमावाने महिला, लहान मुले आणि पुरुषांना अमानुषपणे मारहाण केली असून घरातील साहित्याचीही प्रचंड मोडतोड केली आहे. या प्रकरणी पीडित महिला कामिनी केशव पोवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे ५१ जणांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे.
२४ जुलै २०२३ रोजी गावातल्या लोकांनी त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ केली होती. ज्याविरोधात. कामिनी पोवार यांनी रत्नागिरी न्यायालयात १८ लोकांवर खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी ७ जुलै २०२६ रोजी झाली. ज्यामध्ये कामिनी यांचे दीर विश्वास पोवार आणि जाऊ संयुक्ता पोवार यांनी आरोपींविरोधात न्यायालयात साक्ष दिली. याचाच तीव्र राग मनात धरून ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कामिनी यांचे पती कामानिमित्त मुंबईला गेल्याची संधी साधून गावातील ५१ जणांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह त्यांच्या घराभोवती जमा झाला.
भीतीपोटी कुटुंबाने दरवाजे बंद केले. मात्र जमावाने दोन्ही दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि दिसेल त्याला बेदम मारहाण सुरू केली. जमावातील लोकांनी लाकडी दांड्याने मारल्यामुळे कामिनी यांच्या जाऊ संयुक्ता यांच्या खांद्याचे हाड फॅक्चर झाले आहे. तर कामिनी यांच्या पोटावर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी वाचवायला आलेल्या नणंदेलाही जमावाने ‘परत आलीस तर ठार मारू” अशी धमकी दिली. दुपारी १२ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता, असे कामिनी यांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे. दरम्यान कुटुंबाने भीतीचे सावट दूर करून न्यायाची मागणी केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.