एटीएम कार्ड बदलून ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक
विश्वनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये हातचलाखी; सुरतच्या संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरीः रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये नागरिकांचे एटीएम कार्ड बदलून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरत येथील एका संशयिताविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. डी-२१४, सदगुरू अपार्टमेंट, ए.एच. रोड, सुरत सिटी, जि. सुरत) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) जुलै सकाळी साडेअकराच्या सुमारास बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृतिका संजय पाटोळे (वय ५८, रा. उद्यमनगर रोड, रत्नागिरी) या सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास विश्वनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये व्यवहारासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये उपस्थित असलेल्या धिरजकुमार पांचाळ याने हातचलाखी करत त्यांचे एटीएम कार्ड बदलल्याचा आरोप आहे.
संशयिताने फिर्यादींना दुसरे एटीएम कार्ड देऊन त्यांची दिशाभूल केली. त्यानंतर त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातील मूळ एटीएम कार्डचा वापर करून ५० हजार रुपये रोख काढण्यात आले. एवढ्यावरच न थांबता, प्रियांका वाईन मार्ट येथे त्या कार्डद्वारे ७,७०० रुपयांचा व्यवहारही करण्यात आला. त्यामुळे फिर्यादींची एकूण ५७ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.
हा घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर स्मृतिका पाटोळे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित धिरजकुमार पांचाळ याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये, कार्ड किंवा पिनची माहिती कोणालाही देऊ नये तसेच व्यवहारानंतर कार्डाची खात्री करूनच एटीएममधून बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.