मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथील शांतीनगर, रेस्ट हाऊसजवळ बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गोव्याहून मुंबईकडे निघालेली क्रेटा कार (MH 01 CP 8021) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) मागून जोरात धडकल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
अपघातात दोन महिला आणि एका पुरुषासह एकूण चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.