रत्नागिरीचा कायापालट; कोट्यवधींचा विकासनिधी मंजूर,
शहरात उभारणार भव्य शॉपिंग सेंटर
रत्नागिरी:
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणारी आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणारी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विशेष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा भरघोष निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून, यामुळे रत्नागिरी शहराच्या विकासाला कमालीची गती मिळणार आहे.
या सर्वसमावेशक विकास आराखड्यांतर्गत रत्नागिरी शहरात स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आणि रोजगाराला चालना देण्यासाठी एक भव्य व अद्ययावत शॉपिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५ मधील आरक्षण क्रमांक ५८ च्या जागेवर हे भव्य शॉपिंग सेंटर साकारले जाईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी विशेषत्वाने मंजूर करण्यात आला आहे. या शॉपिंग सेंटरमुळे परिसराचा चेहरामोहरा तर बदलेलच, शिवाय शहरातील स्थानिक व्यावसायिकांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार असून नगरपालिकेच्या उत्पन्नातही यामुळे शाश्वत भर पडणार आहे.
शॉपिंग सेंटरसोबतच रत्नागिरी शहराच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणखी १४ कोटी ३० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामध्ये नगरपरिषद प्रशासकीय इमारतीच्या मुख्य इमारतीची सुधारणा करणे आणि आवश्यक अनुज्ञेय विकासकामे करण्यासाठी ४ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आधुनिक बदलांमुळे पालिकेचे कामकाज अधिक गतिमान आणि अत्याधुनिक होण्यास मोठी मदत होणार आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील पालिका शाळांच्या इमारतींचे बांधकाम आणि नूतनीकरण करण्यासाठी ७ कोटी रुपयांचा मोठा निधी देण्यात आला आहे. यामुळे शाळांमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होतील. तसेच, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील पानवल परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ‘पानवल पाणी वितरण व्यवस्था’ सुधारण्याकरिता ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे येथील पाणीपुरवठा अधिक सुरळीत होईल.
सांस्कृतिक क्षेत्राचा विचार करता, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नाट्यगृहामध्ये प्रेक्षक आणि कलाकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले अग्निशामक व्यवस्था व तत्सम अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी ७५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी शिक्षण, सुरक्षा, पाणी आणि प्रशासन अशा सर्वच स्तरांवर एकाच वेळी कोट्यवधींचा निधी आणून रत्नागिरी शहराच्या विकासाची घोडदौड कायम ठेवली आहे. या सर्व विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल रत्नागिरीतील नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी वर्ग, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाकडून पालकमंत्री व आमदारांचे मनापासून आभार मानले जात आहेत.