धारदार कोयता बाळगणाऱ्या तरुणावर गुन्हा
राजापूर:
राजापूर तालुक्यातील कोंडये परिसरात संशयास्पद स्थितीत धारदार कोयता बाळगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर राजापूर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रथम प्रकाश मांजळकर (वय २१, रा. कोंडये खालचीवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुशांत अशोक लव्हटे हे गस्तीवर असताना त्यांना मौजे कोंडये येथील ब्रीजखालील पिकशेडजवळ प्रथम मांजळकर हा संशयास्पद हालचाली करताना आढळला. त्याच्याकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली असता, त्याच्या ताब्यात एक धारदार लोखंडी कोयता मिळून आला.
पोलीस शिपाई लव्हटे यांनी संशयित आरोपीकडे या कोयत्याबाबत आणि तो बाळगण्याचे कारण विचारले असता, आरोपीला कोणतीही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. सदरची वस्तू चोरीची किंवा लबाडीने मिळवलेली असावी, असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी कारवाई केली.
यावेळी पोलिसांनी अंदाजे १०० रुपये किमतीचा सुमारे १८ इंच लांबीचा अर्धचंद्राकृती वक्र आकाराचा धारदार कोयता जप्त केला. या कोयत्याच्या पात्यावर गंज चढलेला असून तो वापरून झिजलेला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सुशांत लव्हटे यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.