सामाईक जमिनीतील खैराची झाडे तोडल्याप्रकरणी ग्रामपंचायत शिपायाविरोधात तक्रार
राजापूर:तालुक्यातील तळगाव येथील सामाईक जमिनीतील खैराची चार झाडे परवानगीशिवाय तोडल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीतील शिपाई प्रताप संजय सावंत याच्याविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तळगाव पाटीलवाडी येथील भूषण विलास सावंत यांनी आपल्या वयोवृद्ध वडील विलास धाकू सावंत यांच्या वतीने ही तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, सर्वे क्रमांक २७६५ मधील गौळणमळी परिसरातील सामाईक जमिनीत असलेली सुमारे १० ते १२ वर्षे वयाची खैराची चार झाडे ऑगस्ट २०२५ मध्ये परवानगीशिवाय तोडून नेण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कामगारांकडे चौकशी केली असता, त्यांनी प्रताप सावंत यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली. वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून आपला अहवाल राजापूर पोलिसांकडे सादर केला आहे.
या प्रकरणात प्रताप संजय सावंत यांनी खैराची झाडे बेकायदेशीरपणे तोडून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राजापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.