गुहागर तालुक्याला पावसाचा तडाखा
गुहागर: प्रतिनिधी
वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गुहागर तालुक्याला अक्षरशः झोडपले.रविवारी संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते.तर काही ठिकाणी महावितरणच्या विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून वीजपुरवठा वारंवार खंडित झाला.अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडल्या.
या पावसाने पांगारीतर्फे हवेली येथे रस्त्यावरील मोरी खचली. साखरी त्रिशुळ म्हसकरवाडी येथे विद्युत पोल रस्त्याच्या बाजूला कलंडला.वरचापाट तर्फे गुहागर दुर्गादेवीवाडी येथील प्रमिला प्रभाकर सांगळे यांच्या घरच्या पडवीवरती आंब्याचे झाड पडून नुकसान झाले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पांगारी तर्फे हवेली येथे धर्मराज पवार यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून त्यांच्या आई सविता पवार या किरकोळ जखमी झाल्या.तर येथील रस्ता देखील खचला होता. जि. प.शाळा तळवली नं.3 शाळेच्या पाण्याच्या टाकीवर झाड पडून पाण्याच्या टाकीचे नुकसान झाले आहे.वाकी पश्चिम वाडी येथील प्रतीक्षा कताळे यांच्या घराचे सिमेंट पत्रे उडून घराचे नुकसान झाले आहे. रानवी येथील मोहन कांबळे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडले. जांभारी येथील नयनेश सुर्वे यांच्या घरावर झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे.तर येथील रमेश धर्मा भागाडे यांच्या घरावर झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे तर वेदिका भागाडे या किरकोळ जखमी झाल्या आहेत.पालपेणे तळ्याची वाडी येथील कृष्णा टाणकर यांच्या घरावरती आंब्याचे झाड पडून पत्र्याचे अंशतः नुकसान झाले. चाळकेवाडी तर्फे धोपावे येथील प्रमिला चाळके यांच्या घराचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले. अंजनवेल फाटा परिसरात रस्त्यावर झाड आडवे आल्याने मार्ग बंद झाला होता.दरम्यान सोमवारी पावसाचा जोर थोडा कमी झाला होता.