भंडारी समाजातील शिक्षण क्षेत्रात उत्तुंगभरारी घ्यावी : प्रसन्नशेठ आंबुलकर
भंडारी समाज संघाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
रत्नागिरी: रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम कित्ते भंडारी हॉल, रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाला. १० वी, १२ वी, पदवी, पदवीका, ५ वी, ८ वी स्कॉलरशिप आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु. न्यासा प्रेमेश पेडणेकर हिने इ. १० मध्ये ९८ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांकाचे बक्षीस संपादन केले. त्याबद्दल संघाच्यावतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसन्नशेठ आंबुलकर यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
रोख रक्कम, शिष्यवृत्ती, वह्या, छत्री, पुष्प अशा स्वरुपात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशन्नशेठ आबुंलकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन करुन समाजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपले सहकार्य असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घ्यावी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम आम्ही समाजसेवक म्हणून नक्की करु. कोणीही होतकरु गरीब विद्यार्थी मागे रहात असेल तर त्याला समाज संघाच्यावतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदा मुरकर यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, ग्रामीण भागातच खरी स्कॉलर मुले आहेत. त्यांच्या पर्यंत पोहचून त्यांना कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात मदत केल्यास आपला समाज प्रगती करु शकेल. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्या भंडारी समाजाचे योगदान अमूल्य आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती श्री. समीर तिवरेकर यांनी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ गेली १९ वर्षे अत्यंत चांगले काम करत असून सर्व क्षेत्रात भंडारी मुले आली पाहिजेत त्यासाठी मी समाज संघाला सर्वोतपरी मदत करण्यासाठी कायम कटीबद्ध असल्याचे सांगितले.
प्रस्तावना करताना संघाचे अध्यक्ष श्री. राजीव कीर संघाच्या पारदर्शक कारभारामुळे अनेक वर्षे संघाची घोडदौड चालू आहे. अनेक अडथळे पार करत संघ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक भंडारी बांधवाने या कार्यात सहभागी होवून ज्यांना जमेल तशी मदत समाज संघाला करुन समाजाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून शेती शास्त्रज्ञ डॉ. दिलीप नागवेकर, निवृत्त तहसीलदार श्री. राजेंद्र बिर्जे, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राजन कीर सर, रत्नागिरी नगर परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती सौ. प्रिती सुर्वे, नगरसेविका सौ. जागृती पिलणकर, विनायक भाटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव चंद्रहास विलणकर व उपाध्यक्ष ऍड. सौ. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले. तर खजिनदार आर. के. विलणकर यांनी सर्व प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, पालक, शिष्यवृत्ती देणगीदार आणि संघाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले.