दोन एस.टी. बसेसची समोरासमोर धडक
बस चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरीतील शिळ पवारवाडी स्टॉप येथे दोन एस.टी. बसेसची समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना २ जुलै २०२६ रोजी सकाळी घडली. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी चालक वलीखान गुलाबखान पठाण (वय ३७, सध्या रा. महालक्ष्मी, रत्नागिरी) हा एस.टी. बस (क्र. एम.एच. १४ बी.टी. २२३१) घेऊन रत्नागिरी बसस्थानक ते भावेआडम मार्गावरून परत येत होता. सकाळी ६.५० च्या सुमारास शिळ पवारवाडी स्टॉपजवळ आला असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. परिणामी, बस रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या एस.टी. बसला (क्र. एम.एच. १४ बी.टी. ४४५९) धडकली.
चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अत्यंत अविचाराने, हयगयीने आणि निष्काळजीपणे बस चालवल्याने हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या भीषण धडकेत दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून, बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातात तन्वी गोविंद रेवाळे, स्नेहल संतोष खापणे, सुजल दशरथ सनगरे, तृप्ती लहु तांबे, प्रतिक दिलीप तांबे, सिद्देश दिलीप खापणे, तेजस्वीनी अशोक खापणे, आदीती सत्यवान तांबे, कल्याणी गोविंद रेवाळे, सदिच्छा दशरथ सनगरे, आर्या राजन जाधव, धनश्री बबन सनगर हे प्रवासी तसेच चालक वलीखान पठाण स्वतः जखमी झाले आहेत.
या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अमिता संदिप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी वलीखान पठाण याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बी.एन.एस.एस. कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये ‘ई-साक्ष’ ॲपचा वापर करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.