जिल्ह्यातील ३५ शाळा ‘शून्य शिक्षकी’
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात पटसंख्येच्या अभावामुळे ३४ शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या, तर १०५ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यास तब्बल ९९ शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, समायोजन प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिल्याने जिल्हयातील ६१ शाळांचे अस्तित्व वाचले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जर ही प्रक्रिया जशीच्या तशी राबवली असती, तर जिल्ह्यातील ९९ शाळांमधून शिक्षक कमी होऊन त्या ‘शून्य शिक्षकी’ झाल्या असत्या. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शाळा वाचवण्यासाठी नियम कडक न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
शाळांसाठी २० पटसंख्येची अट शिथिल करून समायोजन प्रक्रिया राबवल्यामुळे ६१ शाळांना थेट फायदा झाला असून, त्या शाळा पूर्णपणे बंद पडण्यापासून वाचल्या आहेत.
३५ शाळांचे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत वर्ग
जरी ६१ शाळा वाचल्या असल्या, तरी सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील ३५ शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या आहेत. मात्र, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. या ३५ शाळांमधील विद्यार्थ्यांचे त्यांच्या जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे.