चिपळूणमधील उद्योगांना ‘जलसंकटा’चा विळखा
४० वर्षांत प्रथमच कारखाने बंद पडण्याच्या उंबरठ्यावर
चिपळूण: लोटेसह चिपळूण तालुक्यातील तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील अनेक कारखाने पाण्याअभावी बंद झाले आहेत. ४० वर्षांत प्रथमच अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे उद्योजकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. पुढील दोन दिवसांत सर्व कारखाने अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवण्याची वेळ उद्योजकावर येणार आहे.
कोयना धरणातील पाण्यावर पोफळी, कोळकेवाडी आणि अलोरे येथील वीज निर्मिती प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतरचे पाणी वाशिष्टी नदीला सोडले जाते. एमआयडीसीने हे पाणी उचलण्यासाठी चिपळूणला वालोपे येथे जॅकवेल बसवली आहे. या जॅकवेलच्या माध्यमातून एमआयडीसी वाशिष्टी नदीतून दिवसाला १६ लाख लिटर पाणी उचलते आणिते लोटे-परशुराम खेर्डी, खडपोली येथील उद्योजकांना पुरवते.
सध्या कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प असल्यामुळे वाशिष्टी नदीला पाणी येत नाही. परिणामी एमआयडीसीचे पंपिंग स्टेशन १५ जूनपासून बंद आहे. तेव्हापासून चिपळूण व खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आज घरडा कंपनीचे सात युनिट बंद करण्यात आले. इतरही कारखानदारांनी आपले युनिट बंद केले आहेत.
लोटे एमआयडीसीतील औषध निर्माण, केमिकल आणि ऍग्रिकल्चर कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. अतिरिक्त लोटे एमआयडीसीतील कोको कोला कंपनीसह अनेक कंपन्यांचे पाणी हेच कच्चा माल आहे. खेर्डी, खडपोली एमआयडीसीचाही पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे कारखानदारांना कॅन्टीनमध्ये पाणी नाही. पिण्यासाठी पाणी नाही. प्राथमिक विधीसाठी सुद्धा पाणी नाही. लोटेतील काही कारखानदारांकडे स्टोरेज टॅंकमध्ये पाणी होते; मात्र तो संपल्यामुळे कारखाने बंद आहेत.
महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
कोयना प्रकल्पाची वीज निर्मिती बंद झाल्यानंतर कोळकेवाडी धरणातील पाणी कारखानदारांना कसे देता येईल यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता बी. एन. पाटील यांनी महानिर्मिती कंपनीचे पोफळी येथील मुख्य अभियंता राजेश कुंभार यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, मुख्यअभियंता श्री. कुंभार यानीही हतबलता दाखवली.
पाणीटंचाईचा फटका बसलेले कारखानदार
घरडा केमिकल प्रा. लि, डाऊ ॲग्रो, विनंती, एक्सेल, अल्फा ब्लू केम प्रा. लि. थर्स ऑरगॅनिक प्रा. लि, दीपक केमटेक्स प्रा. लि. केशर पेट्रोप्रॉडक्ट्स लिमिटेड, सहस्र केमिकल्स प्रा. लि, डॉर्फ केटलइतर कंपन्या : ए. बी. मॉरी (इंडिया) प्रा. लि., लक्ष्मी ऑरगॅनिक, पिंटोके, आणि निरॅक पेन्ट्स. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज या नामांकित कंपन्यांना पाणीटंचाईचा फटका बसला आहे.