रत्नागिरी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामांचा ‘धडाका’
ऐन रहदारीच्या वेळी रस्ते खोदाईमुळे नागरिक त्रस्त
रत्नागिरी:
पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा नियम असतानाही, रत्नागिरी नगरपालिकेकडून ऐन पावसाळ्याच्या दिवसात शहरात विकासकामांचा धडाका सुरू आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा फायदा घेत प्रशासनाकडून सुरू असलेल्या या कामांमुळे आता सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जेल रोड नाक्यावर वाहतूक कोंडीचा विळखा असून शिकवणारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जेल रोड नाका येथे रस्ते कामाचा मुहूर्त साधण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, शहराच्या या मुख्य रस्त्याचा एक भाग ऐन वर्दळीच्या वेळी बंद केल्याने चारही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. भर दुपारी कडक उन्हात वाहनचालक अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले.
शाळा-महाविद्यालयांच्या सुटीच्या वेळीच कामाचा बडगा
दुपारची वेळ ही शाळा-महाविद्यालये सुटण्याची असते. त्यामुळे या ट्रॅफिक जाममध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक तासनतास अडकून पडले होते. प्रशासनाच्या या अवेळी सुरू असलेल्या कामामुळे नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. “नगरपालिका नागरिकांच्या हिताचे काम करत असल्याचा दावा करते, पण प्रत्यक्ष कृती मात्र असंवेदनशील आहे,” अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
‘आम्ही विकास कामे करतोय, मग काहीही करणार’ अशा अविर्भावात नगरपरिषद प्रशासन वागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रस्ते खोदाई आणि कामांचे नियोजन करताना नागरिकांच्या सोयींचा विचार का केला जात नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. आता या मनमानी कारभारावर अंकुश कोण ठेवणार आणि नागरिकांच्या समस्यांची दखल कोण घेणार, हा खरा प्रश्न आहे.