वरुणराजाला साकडे घालण्यासाठी रत्नागिरीत मुस्लिम बांधवांचा जनसागर उसळला
रत्नागिरी:
रत्नागिरी आणि संपूर्ण परिसरात पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्यामुळे नागरिक चिंतेत पडले आहेत. निर्माण झालेले हे भीषण संकट दूर व्हावे आणि तात्काळ सुखद पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी एकत्र येत वरुणराजाला साकडे घातले. जमियत उलेमा रत्नागिरीच्या वतीने शुक्रवार, १९ जून रोजी असरच्या नमाजनंतर राजनगर येथील मरकझ मैदानावर विशेष पावसासाठीची सामूहिक प्रार्थना अत्यंत भक्तीमय आणि भावूक वातावरणात संपन्न झाली. या विशेष प्रार्थनेसाठी रत्नागिरी शहर आणि परिसरातील शेकडो मुस्लिम बांधवांचा अभूतपूर्व जनसागर उसळला होता.

हाफिज नूरुल्लाह यांच्या नेतृत्वात नमाज
प्रार्थनेची सुरुवात होण्यापूर्वी मुफ्ती खल्फान कासमी यांनी उपस्थित जनसमुदायाला ‘नमाझ-ए-इस्तिस्का’ पठणाची पद्धत आणि तिचे महत्त्व सविस्तर समजावून सांगितले. निसर्गाचा कोप आणि पावसाची टंचाई हे मानवी चुकांचेही परिणाम असू शकतात, याची जाणीव करून देत त्यांनी सर्वांनी आपल्या चुकांची मनापासून माफी मागावी, असे सांगितले. तसेच सर्वांनी अधिकाधिक क्षमायाचना करावी आणि गरिबांना सढळ हाताने दानधर्म करावा, असे कळकळीचे आवाहन केले. यानंतर हाफिज नूरुल्लाह यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी शिस्तबद्ध रीतीने ही विशेष नमाज अदा केली.
नमाज संपन्न झाल्यानंतर मुफ्ती खल्फान यांनी ‘खुत्बा’ म्हणजेच धार्मिक प्रवचन सादर केले. या प्रवचनानंतर मौलाना इलियास बगदादी यांनी अल्लाहच्या दरबारात पाऊस पाडण्यासाठी विशेष प्रार्थना केली. मौलाना बगदादी यांनी अत्यंत आर्त सुरात, भावूक होऊन आणि रडवून सोडणाऱ्या शब्दांत अल्लाहकडे लवकरात लवकर आणि सर्वांसाठी फायदेशीर ठरेल असा कृपेचा पाऊस पाडण्याची आळवणी केली. या अत्यंत संवेदनशील आणि भक्तीमय क्षणी मैदानावर उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांचे डोळे पाणावले होते. प्रत्येक जण मनोभावे पावसासाठी प्रार्थना करत होता.

आयोजकांकडून आभार व्यक्त
कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी मौलाना फहीम यांनी प्रार्थनेसाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले. जमियत उलेमा रत्नागिरीचे अध्यक्ष मौलाना जुबेर नाकाडे यांच्या एका छोट्याशा आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीतील मुस्लिम बांधव एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आले, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “अल्लाह आपल्या सर्वांच्या चुका नक्कीच माफ करेल आणि या भागात रहमतचा पाऊस पाडून सर्वांना सुखावणार करेल,” असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हा धार्मिक विधी यशस्वी करण्यासाठी राज नगर मरकझचे प्रमुख अशरफ नाईक आणि व्यवस्थापन समितीने मोलाचे परिश्रम घेतले. तसेच कायदा, सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी मस्जिदवार जमातीचे स्वयंसेवक तत्परतेने सेवेत रुजू होते. या सर्वांच्या अमूल्य सहकार्याबद्दल जमियत उलेमा रत्नागिरीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. या सामूहिक प्रार्थनेनंतर आता रत्नागिरीत लवकरच सुखद पर्जन्यवृष्टी होईल, अशी आशा सर्व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.