रत्नागिरीत भाजप पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची मांदियाळी
रत्नागिरी:
रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला आज जोरदार उत्साहात सुरुवात झाली. आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठक सुरू झाली आहे.
या बैठकीला भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. यामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, आमदार प्रशांत ठाकूर आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. कोकणातील भाजपची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी या सर्व नेत्यांची उपस्थिती कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरणारी ठरत आहे.
याशिवाय, स्थानिक पातळीवरील पक्ष संघटना मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, वैभव खेडेकर, ॲड. दीपक पटवर्धन आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर या सर्वच प्रमुख मान्यवरांनी व्यासपीठावर उपस्थिती लावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. सावरकर नाट्यगृह कार्यकर्त्यांच्या गर्दीने आणि घोषणाबाजीने पूर्णपणे ओसंडून वाहताना दिसत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची रणनीती ठरवणे, शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे आणि जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे या मुख्य उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर मान्यवरांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. या बैठकीत नेत्यांकडून कार्यकर्त्यांना काय कानमंत्र मिळतो आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना कोणती नवी दिशा मिळते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
