कोळी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन
रत्नागिरी: आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी व डोंगर कोळी या जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, या प्रमुख मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आदिवासी कोळी समाजाच्या प्रमाणपत्र समस्या सोडवण्यासाठी २० ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर उच्चस्तरीय बैठक झाली होती. यात अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि समाज प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, दोन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही त्या निर्णयांची वा इतिवृत्ताची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने परिपत्रक काढण्यास टाळाटाळ केल्याने समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन सादर करण्यात आले.
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा सुरू आहे. या अनुषंगाने राज्यभर एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलने करण्यात आली. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला नाही, तर रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवा प्रदेशाध्यक्ष डॉ. चेतन पाटील यांनी दिला आहे. कोळी महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पोक्षे यांनी आंदोलनाचे महत्त्व स्पष्ट केले.
या धरणे आंदोलनाप्रसंगी कोळी महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पांडुरंग पावसे , जिल्हा संपर्क प्रमुख पंढरीनाथ चौगुले, ओबीसी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी अनिल पोटफोडे, बाबा साळवी, रामभाऊ गराटे, दामोदर लोकरे, राजू राठोड, शांताराम मालप, श्रीकृष्ण चव्हाण, बी. टी. झोरे, रघुवीर शेलार, सुधीर वासावे, राजू किर (अध्यक्ष, भंडारी समाज), सुनीता सांगळे यांच्यासह कोळी महासंघातील मोहन तबीब, हरेश्वर कातेकर, कमलाकर चौगुले, दत्ताराम चौगुले, रोहिदास चौगुले, धनाजी भोईनकर यांसह आदिवासी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.