महायुती म्हणून रत्नागिरीच्या विकासासाठी कटिबद्ध: ना. उदय सामंत
रत्नागिरी:
“शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी मांडलेली भूमिका ही पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सामूहिक भावना आहे. महायुती म्हणून काम करताना कोणा एकाने श्रेय घेण्यापेक्षा हे सांघिक श्रेय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे,” असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणून काम करताना आपण कधीही दुजाभाव केला नसल्याचे सांगत सामंत म्हणाले की, “भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना शिवसेनेच्या नगरसेवकांप्रमाणेच ४० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे, किंबहुना काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे माझ्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही.” रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास साधताना मुंबईप्रमाणे सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन, संवादाने प्रश्न सोडवण्यावर आपला भर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. रत्नागिरीत ‘बायोमेडिकल वेस्ट’ प्रकल्पाची अत्यंत गरज असून, मेडिकल कॉलेज आणि वाढत्या रुग्णालयांच्या पार्श्वभूमीवर या कचऱ्याचे विघटन करणारी यंत्रणा लवकरच उभारण्यात येईल, ज्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंटसारख्या मोठ्या वैद्यकीय सुविधा येथे सुरू करणे सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यातील पाणी आणि शेतीच्या परिस्थितीबाबत बोलताना सामंत यांनी स्पष्ट केले की, सध्या काही धरणांमध्ये १२ ते १५ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणी लांबवण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट टळेल. असे असले तरी जिल्ह्यात बियाणे वाटपासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, त्याचे वाटपही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करूनच पुढील पावले उचलावीत, असा सल्ला त्यांनी दिला. रत्नागिरी विमानतळाच्या कामाबाबत महत्त्वपूर्ण माहिती देताना ते म्हणाले की, “विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, ‘एअर अलायन्स’ कंपनीची निवड निश्चित झाली आहे. पुढील १५ दिवसांत संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार (MoU) केला जाईल, ज्यामुळे प्रवाशांची विमान वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.”
शाळांच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत सामंत यांनी दामले विद्यालयाचे कौतुक केले. “दामले विद्यालय ही राज्यातील नगरपालिकेची अशी एकमेव शाळा आहे, जिथे पहिलीच्या वर्गात यंदा २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या मराठी शाळेचे उत्तम प्रेझेंटेशन आपल्याला देशपातळीवर न्यायचे आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या ६२ शाळांची दुरुस्ती सुरू असल्यामुळे सध्या त्या शाळा अन्य सुरक्षित ठिकाणी भरवल्या जात असून, काम पूर्ण होताच विद्यार्थी मूळ शाळेत परततील, असे त्यांनी स्पष्ट केले. कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत चिंता व्यक्त करताना त्यांनी लोकप्रतिनिधींसोबतच प्रसारमाध्यमांनीही जनजागृती करून मराठी शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. तसेच, रत्नागिरीच्या विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना, विशेषतः महिलांना सक्षम करणाऱ्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीचे सरकार पूर्ण ताकदीने काम करेल, असे सामंत यांनी शेवटी सांगितले.