जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज नंबर १ येथे शाळा प्रवेशोत्सव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
डॉ. पद्मजा कांबळे – पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती
रत्नागिरी तालुक्यातील खानू केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणीज नंबर १ या शाळेत शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ या वर्षाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नाणीज पंचायत समिती गणाच्या सदस्या मा .डॉ. पद्मजा कांबळे, नाणीज गावचे माजी सरपंच तथा प्रशासक मा विनायक शिवगण, गावचे पोलीस पाटील मा. नितीन कांबळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. दत्ताराम खावडकर, माजी विद्यार्थी संघ नाणीजचे उपाध्यक्ष मा. चिराग खटकूळ, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मा. श्रीराम दाणी, सखी सावित्री समिती सदस्य मा. दिलीप भागवत,शिक्षण प्रेमी सदस्य मा. निलेश हतपले, माजी विद्यार्थी संघ नाणीजचे सदस्य मा. अनिल खावडकर यांसह ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्व प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभागफेरी काढून घोषणा देत जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मान्यवर व पालक यांनी इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना औक्षण करून गुलाब पुष्प व खाऊ देऊन, त्यांच्या पाऊलांचे ठसे कागदावर उमटवत , हात धरून सन्मानपूर्वक वर्गात प्रवेश देण्यात आला.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता पाटील व शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीराम दाणी यांनी केले. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण करण्यात आले.
शाळा पूर्व तयारी मेळावा टप्पा क्रमांक दोन चे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्वच मान्यवरांनी शिक्षक होत पहिलीतील विद्यार्थ्यांची क्षेत्रनिहाय प्रगतीचा आढावा घेतला.
पंचायत समिती सदस्य मा. डॉ. पद्मजा कांबळे मॅडम यांनी सर्व मुलांना खाऊचे बॉक्स वाटप केले.
शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर यांनी केले.