कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती ठप्प
चिपळूण: महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती पाण्याअभावी ठप्प झाली आहे. अतिउच्च गरजेच्यावेळी महाराष्ट्राची विजेची गरज भागविणारा कोयना वीज प्रकल्प पाण्याअभावी आता ठप्प झाला आहे. या वीज प्रकल्पातून अंतर्गत वापरासाठी अवघी ४० मेगावॅट वीजनिर्मिती होत असून कोयना वीज प्रकल्पाचे टप्पा-३ व टप्पा-४ पूर्णतः ठप्प आहे, तर फक्त टप्पा-१ व २ मधून किरकोळ अंतर्गत वापरासाठी वीजनिर्मिती केली जात आहे.
कोयना येथील शिवसागर जलाशयाच्या पाण्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पोफळी व कोळकेवाडी येथे वीजनिर्मिती करण्यात येते. कोयना धरणाचे पाणी लेक टॅपिंगच्या माध्यमातून बोगद्याद्वारे चिपळूणमध्ये आणून विद्युत जनित्राद्वारे ही वीजनिर्मिती होत असते. राज्याची विजेची अतिउच्च मागणी ज्यावेळी असते म्हणजेच सकाळी व सायंकाळच्यावेळी पीक अवर्समध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प चालविला जातो. सर्वात स्वस्त आणि कोणतेही प्रदूषण न करणारी व स्वस्त वीज म्हणून शिवाय फक्त पीक अवर्समध्येच कोयना जलविद्युत प्रकल्प महाजनकोच्या माध्यमातून चालविला जातो. गतवर्षी सर्वाधिक वीजनिर्मिती या प्रकल्पातून करण्यात आली होती. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी असून सद्यस्थितीत कोयना धरणामध्ये अवघे ९.३१ टीएमसी पाणी अर्थात ९.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अजूनही पावसाने जोर धरलेला नसल्याने कोयना खोऱ्यामध्ये फारसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दररोज पाण्यामध्ये घट होत आहे. या शिवाय असलेले जल हे वीजनिर्मिती करण्याइतपत पुरेसे नसल्याने कोयना वीज प्रकल्पातील वीजनिर्मिती ठप्प झाली आहे.