गुटख्याची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
दापोलीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
दापोली: राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व पानमसाल्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एकावर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नर्सरी रोड, केळसकर नाका परिसरात केलेल्या कारवाईत सुमारे १,६७८ रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संकेत शंकरराव कोणेरी यांनी याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अशपाक महमद मनियार (वय ६२, रा. मच्छी मार्केट, दापोली) याच्याकडे प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार १० जून रोजी दुपारी १२ वाजता प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली.
आरोपी मनियार याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने हे प्रतिबंधित अन्नपदार्थ कोठून व कोणाकडून खरेदी केले, याचा कोणताही तपशील दिला नाही. मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक असलेल्या आणि भावी पिढीच्या जनुकीय संरचनेवरही परिणाम करू शकणाऱ्या प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ७२० रुपये किमतीचे ‘केसरयुक्त विमल पान मसाला’ (किंग पॅक) ४० पाकिटे आणि ५२८ रुपये किमतीचा इतर माल असा एकूण १,६७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.