आरे समुद्रात 41 विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला स्थानिकांनी वाचवले
रत्नागिरी
आरे समुद्र किनारी कोल्हापूर येथील खासगी शिकवणी क्लासेस मधून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मंगळवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाला येथील पोलिस कर्मचारी आणि झीप लाईनच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत वाचवले.
अतुल रघुनाथ सुतार (१७, रा. कोल्हापूर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मयूर विष्णू खाडे (16, रा. कोल्हापूर) याला स्थानिकांनी वाचवले. आरे समुद्रकिनारी कोल्हापूर येथून 41 विद्यार्थ्यांचा समूह आपल्या शिक्षकांसह दाखल झाला होता. हे 41 विद्यार्थी मंगळवारी दुपारी आंघोळीसाठी आरे समुद्रात उतरले. मात्र या 41 विद्यार्थ्यांपैकी अतुल सुतार हा विद्यार्थी पोहत पोहत समुद्रात पुढे पुढे जाऊ लागला. त्याला माघारी बोलवण्यासाठी त्याच्या मागोमाग त्याचा मित्र मयूर खाडे हा देखील गेला. मात्र पाण्याच्या करंटचा अंदाज न आल्याने अतुल सुतार हा पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला मयूर देखील पाण्यात बुडू लागला. दोघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.