दोषारोप पत्रे न्यायालयात सादर करण्यात रत्नागिरी पोलिसांची शंभर टक्के कामगिरी
रत्नागिरी,
गुन्ह्यांचा तपास वेळेत पूर्ण करून आरोपींना कायद्याच्या चौकटीत उभे करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. जिल्हा पोलीस दलामार्फत विविध गुन्ह्यांमध्ये विहित मुदतीत १०० टक्के दोषारोप पत्रे माननीय न्यायालयात सादर करून एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बागटे यांनी घेतलेल्या एका विशेष आढावा बैठकीमध्ये जिल्हा पोलीस दलाची ही कौतुकास्पद आणि गतिमान कामगिरी अधोरेखित झाली आहे.
हा आढावा १ जानेवारी २०२६ ते १८ मे २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने दोन गटांतील गुन्ह्यांचा समावेश होता. यामध्ये १० वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे आणि १० वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे. 10 वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये या कालावधीत एकूण ७८० गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ३२७ गुन्ह्यांमध्ये विहित मुदतीत दोषारोप पत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. उर्वरित ३२४ गुन्हे सध्या तपासाधीन असून, त्यांचे ६० दिवस अद्याप पूर्ण झालेले नाहीत.
१० वर्षांपेक्षा जास्त शिक्षेचे गुन्ह्यांमध्ये एकूण ४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी २५ गुन्ह्यांमध्ये विहित मुदतीत दोषारोप पत्रे सादर करण्यात आली आहेत. उर्वरित २४ गुन्हे तपासाधीन असून, त्यांचे ९० दिवस पूर्ण होणे अद्याप बाकी आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या सर्व गुन्ह्यांमध्ये दोषारोप पत्र सादर करण्याची कायदेशीर मुदत पूर्ण झाली आहे, अशा एकाही गुन्ह्याचा तपास प्रलंबित ठेवण्यात आलेला नाही. या सर्व (१००%) गुन्ह्यांची दोषारोप पत्रे विहित वेळेत न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बागटे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि पोलीस अंमलदारांच्या चोख नियोजनामुळे हे यश मिळाले आहे. वेळेत, काटेकोरपणे आणि योग्य समन्वयाने तपास पूर्ण केल्यामुळेच जिल्हा पोलिसांना ही उल्लेखनीय कामगिरी करता आली आहे. भविष्यातही गुन्हे तपासाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.