मिरजोळे येथे कचरा, जमिनीच्या वादातून हाणामारी
परस्परांविरोधी ३ गुन्हे दाखल
रत्नागिरी:
तालुक्यातील मिरजोळे भाटकरवाडी येथे सामायिक घर आणि जमिनीच्या जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये शनिवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. अंगणातील कचरा उचलण्यासारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात लोखंडी कुऱ्हाड आणि लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला असून, दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परांविरोधी तक्रारी दिल्यानंतर पोलिसांनी एकूण ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना २३ मे रोजी रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयेकर कुटुंबियांमध्ये नातेसंबंध असून त्यांच्यात सामायिक घर आणि जागेवरून आधीच वाद सुरू आहेत.
सदानंद मयेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी ओंकार दत्ताराम मयेकर, दत्ताराम मयेकर आणि दर्शना मयेकर यांनी त्यांच्या घरात घुसून वाद घातला. चुलते कृष्णा मयेकर यांच्या घरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून हा वाद सुरू झाला. आरोपींनी शिवीगाळ करत सदानंद यांना चापटमारून खाली पाडले, तर ओंकार मयेकर याने सदानंद यांच्या डोक्यात चिव्याची काठी मारून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी गु.र.नं. १६८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
कृष्णा मयेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रात्री १०.३० वाजता आरोपी ओंकार, दत्ताराम, दर्शना आणि नितीन मयेकर यांनी खोलीसमोरील अंगणातील कचरा न उचलल्याच्या कारणावरून वाद उकरून काढला. या चारही जणांनी कृष्णा यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि ओंकारने त्यांनाही चिव्याच्या काठीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी गु.र.नं. १६९/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाचे ओंकार मयेकर यांनीही प्रति-तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी अंगणातील कचऱ्यावरून झालेल्या वादामुळे चुलते कृष्णा मयेकर आणि सदानंद मयेकर हे त्यांच्यावर रागावून होते. रात्री ओंकार कामावरून घरी आले असता, सदानंद आणि कृष्णा मयेकर यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ओंकार यांनी विचारणा केली असता, रागाच्या भरात सदानंद मयेकर याने पडवीतील लोखंडी कुऱ्हाड हातामध्ये घेऊन ओंकार यांच्या डोक्यात उजव्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याचवेळी ओंकार यांचे आई-वडील सोडवासोडव करण्यासाठी आले असता, सदानंद मयेकर याने ओंकार यांच्या आईच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला कडाडून चावा घेतला, तर कृष्णा मयेकर हातात दगड घेऊन मारण्यासाठी धावला. या मारहाणीत ओंकार मयेकर आणि दर्शना मयेकर हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गु.र.नं. १७०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी पोलिसांनी २४ मे रोजी पहाटे ४ ते ७ वाजेच्या दरम्यान या तिन्ही गुन्ह्यांची नोंद केली आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(२), ३३२(ग), ३५१(२) आणि ३(५) यांसह अन्य कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.