रत्नागिरी न. प. कडून १५ कोटींची देयके प्रलंबित
रत्नागिरी : नगरपरिषदेचा आर्थिक कारभार मात्र पूर्णपणे उधारीवर सुरू असल्याचे एक वास्तव समोर आले आहे. विकासकामांचे कंत्राट घेणारे ठेकेदार, साहित्य पुरवठादार आणि थेट निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचे मिळून तब्बल १५ कोटी २१ लाख रुपये देणे प्रलंबित आहेत. सामाजिक कार्यकर्ते अमेय परुळेकर यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीतून न. प.ची विदारक आर्थिक स्थिती समोर आणत त्याची माहिती पत्रकारांसमोर मांडली आहे.
नगर परिषदेच्या या कारभारामुळे कोट्यवधी रुपयांची देयके महिनोन्महिने प्रलंबित आहेत. थकित बिलांसाठी आता ठेकेदारांसह सामान्य नागरिकांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना न. प. चे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परुळेकर यांनी माहिती अधिकारातून समोर आणलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक फटका पाणी पुरवठा विभागाला बसला आहे. या विभागाची ११ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये प्रामुख्याने हायडेन्सिटी पॉलिथिन पाईपलाईनची कामे, जीएसटी आणि इतर विविध पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या बिलांचा समावेश आहे.
पाणी पुरवठा विभागाखालोखाल बांधकाम विभागात रस्ते दुरुस्ती, शाळा, स्टेडियम आणि व्यापारी संकुलांच्या (मार्केट) विकासकामांचे १ कोटी ५ लाख रुपये प्रलंबित आहेत. इतर विभागांचीही अवस्था अशीच दयनीय झाली आहे., विद्युत विभागांतर्गत रस्त्यांवरील पथदिवे, नवीन खांब, वातानुकूलित यंत्रणा आणि ध्वनीक्षेपकांच्या कामांचे ६० लाख रुपये प्रलंबित आहेत. दुसरीकडे, स्वच्छता विभागातील मोबाईल टॉयलेटच्या दुरुस्तीपासून ते थेट बेवारस मृतदेहांच्या विल्हेवाटीसारख्या अत्यंत संवेदनशील कामांची सुमारे १७ लाख रुपयांची बिले प्रशासनाने रोखून धरली आहेत.
वाहन, भांडार, नागरी सुविधा केंद्र लेखा आणि उद्यान विभागातही प्रलंबित देयकांचा डोंगर उभा आहे. या संपूर्ण आर्थिक ओढाताणीत न.प. ची सेवा करून निवृत्त झालेल्या वृद्ध कर्मचाऱ्यांची मोठी ससेहोलपट सुरू आहे. त्यांचे पेन्शन आणि इतर सेवांतर्गत लाभांचे तब्बल १ कोटी रुपये न.प. कडून प्रलंबित आहेत. वाढत्या वयात आणि गंभीर आजारपणात हक्काचे पैसे मिळवण्यासाठी या वृद्ध कर्मचाऱ्यांना न.प. मध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत.