कोकणच्या किनारपट्टीवर ‘टार बॉल्स’ चे नवे संकट
रत्नागिरीः
महाराष्ट्राच्या विस्तीर्ण आणि सुंदर कोकण किनारपट्टीसह मुंबई, नवी मुंबई, पालघर, उरण आणि अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी एक भयानक पर्यावरणीय संकट घोंगावताना दिसत आहे. अरबी समुद्राच्या लाटांबरोबर वाहून येणारे काळे, तेलकट आणि चिकट ‘टार बॉल्स’ केवळ समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य विद्रूप करत नसून, ते सागरी पर्यावरणासाठी एक मोठा धोका बनले आहेत.
या संकटाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘टार बॉल्स मॅनेजमेंट रूल्स २०२६’ चा मसुदा जाहीर केला असून, त्यावर नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि मच्छिमारांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. मात्र, या मसुद्यावर प्रसिद्ध पर्यावरणवादी संस्था ‘आवाज फाउंडेशन’ने तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.
‘आवाज फाउंडेशन’च्या विश्वस्त सुमैरा अब्दुलअली यांच्या मते, मुंबई आणि अलिबाग परिसरात गेली २५ वर्षे सातत्याने ‘टार बॉल्स’ आढळत आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या मध्यापासून ते थेट पावसाळा संपेपर्यंत समुद्रकिनाऱ्यांवर काळ्या गोळ्यांचा खच पडलेला असतो. त्यामुळे हा एखादा अपवादात्मक प्रकार नसून नियमित उद्भवणारे पर्यावरणीय संकट आहे.
प्रशासनाचा दृष्टिकोन अजूनही ‘किनाऱ्यावर आले की साफ करा’ इतकाच मर्यादित असल्याचा आरोप ‘आवाज’ने केला आहे. हजारो स्वयंसेवक हे गोळे गोळा करतात, पण समुद्रात ते निर्माण होण्याचे मुख्य कारण रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा प्रशासनाकडे दिसत नाही. संस्थेने सरकारकडे या टार बॉल्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्याची परवानगी, त्याचा अहवाल सार्वजनिक करणे आणि पर्यावरण निधीतून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
‘टार बॉल्स’ म्हणजे समुद्रात जहाजांमधून सांडलेल्या कच्च्या खनिज तेलाचे घट्ट झालेले छोटे गोळे असतात. समुद्रातील तेलगळती, जहाजांमधून केला जाणारा बेकायदेशीर तेल विसर्ग, ऑफ-शोअर ड्रिलिंगमधील (समुद्रातील तेल विहिरी) त्रुटी आणि समुद्री अपघातांमुळे हे तेल समुद्रात मिसळते. समुद्राच्या लाटा, तीव्र सूर्यप्रकाश आणि रासायनिक प्रक्रियांमुळे या तेलाचे रूपांतर घट्ट काळ्या गोळ्यांमध्ये होते आणि ते वाहत किनाऱ्यावर येतात. अनेकदा ते वाळूत मिसळल्याने उघड्या डोळ्यांनी प्रदूषणाची तीव्रता लक्षातही येत नाही.
या खनिज तेलाच्या गोळ्यांचा सर्वाधिक घातक फटका सागरी परिसंस्थेला बसत आहे. समुद्री पक्ष्यांच्या पंखांना हे
तेल चिकटल्याने त्यांची उडण्याची क्षमता संपते. कासव, मासे, खेकडे हे जलचर या गोळ्यांना अन्न समजून गिळतात, ज्यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू होतो. तेलकट पाण्यामुळे किनाऱ्यालगतच्या माशांची संख्या घटते आणि विषारी घटक माशांच्या शरीरात साचतात. परिणामी, असे मासे बाजारात नाकारले जातात.
हे चिकट गोळे मासेमारीच्या जाळ्यांना चिकटल्याने जाळी खराब होतात आणि ती साफ करण्याचा खर्च वाढतो. जाळी जड झाल्यामुळे मच्छिमारांना खांदेदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो. अनेक भागांत मासेमारी पूर्णपणे बंद ठेवावी लागत असल्याने हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
किनाऱ्यावर येणाऱ्या या रासायनिक गोळ्यांच्या संपर्कात आल्यामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. किनाऱ्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि पर्यटकांना त्वचेवर खाज सुटणे, अॅलर्जी, डर्माटायटिस (त्वचारोग), श्वसनाचे विकार, दमा आणि डोकेदुखी यांसारखे त्रास वाढले आहेत.
पूर्वी २०१० मधील ‘डीपवॉटर होरायझन’ दुर्घटना, २०१७ची चेन्नई तेलगळती आणि मुंबईजवळील ‘एमएससी चित्रा’ जहाजाच्या अपघाताने याचे भयानक परिणाम जगाने पाहिले आहेत. उरणच्या ओएनजीसी (ONGC) प्रकल्पातून होणाऱ्या गळतीमुळेही हे संकट वारंवार ओढावते. सद्यस्थितीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय आखाती संघर्षामुळे समुद्रात तेलगळतीचे प्रमाण वाढले असून, भविष्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.