पेट्रोल-डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ,दहा दिवसात साडे सात रुपयांनी महागले पेट्रोल
रत्नागिरीत २.७३ रुपयांची वाढ होऊन पेट्रोलचे भाव ११३.१६ रुपये प्रतिलिटर
मुंबई: अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचे आणि युद्धाचे गंभीर परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरीत पेट्रोलच्या दरात २.७३ रुपयांची वाढ होऊन पेट्रोलचे भाव ११३.१६ रुपये तर डिझेलच्या दरात २.८१ रुपयांची मोठी वाढ होऊन डिझेल ९९.८१ रुपये प्रतिलिटर झाला आहे.
जागतिक पातळीवरील ऊर्जा संकटामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत सलग दरवाढ सुरू ठेवली आहे. गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ ठरली आहे. या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल तब्बल ७.४१ रुपयांनी महागले आहे. रत्नागिरीत कालपर्यंत पेट्रोलचे दर ११०.४४ रु. होते तर त्यात वाढ होऊन नवीन दर ११३.१६ प्रतिलिटर झाले आहेत. याशिवाय डिझेलचे जुने दर ९७.०१ होते व नवे दर ९९.८१ प्रतिलिटर झाले आहेत.
इंधनाच्या दरात होणाऱ्या या सातत्यपूर्ण वाढीमुळे वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. परिणामी, बाजारात सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या गरजेच्या वस्तू आधीच महाग झाल्या आहेत. दूध आणि ब्रेड यांसारख्या दैनंदिन अन्नपदार्थांच्या किमतीत आधीच वाढ झाली आहे. भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महागल्याने आता महागाईचा आणखी मोठा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकीकडे आर्थिक मंदी आणि बेरोजगारीचे सावट असताना, दुसरीकडे लागोपाठ होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सोशल मीडियासह ठिकठिकाणी नागरिक केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि वाढत्या महागाईवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. जर आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काळात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.