आंबा घाटात रिक्षाचा भीषण अपघात
कोल्हापूरच्या चालकाचा रत्नागिरीत उपचारादरम्यान मृत्यू
साखरपा:
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात आज (शुक्रवारी) पहाटे एक भीषण अपघात झाला. गोवरेवाडी बसथांब्याजवळ मालवाहू रिक्षाला झालेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेले रिक्षा चालक सुरेश शामराव साळोखे (वय ६६, रा. कोल्हापूर) यांचा रत्नागिरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश साळोखे हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH 09 EL 2608) घेऊन कोल्हापूरहून गणपतीपुळेच्या दिशेने निघाले होते. रिक्षामध्ये पेढ्यांचे बॉक्स भरलेले होते, जे ते गणपतीपुळे येथील दुकानदारांना पोहोचवणार होते. मात्र, शुक्रवारी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास गोवरेवाडी बसथांब्याजवळ त्यांच्या रिक्षाला भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की रिक्षा चालक साळोखे हे रिक्षाखालीच दाबले गेले होते.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर आणि कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला रिक्षाखालून बाहेर काढले.
अपघात नेमका कसा झाला, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही. एखाद्या अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताचे गूढ उकलण्यासाठी साखरपा पोलीस आंबा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार आहेत.
अपघातानंतर जखमी सुरेश साळोखे यांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेचा पंचनामा करून साखरपा पोलिसांनी अपघाताचा अधिक तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.