नागझरी नदीच्या डोहात बुडून तिघांचा मृत्यू
खेड:-
तालुक्यातील धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तीन पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसह गुहागर येथील एका १२ वर्षीय मुलाचा आणि ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना सोमवार, १८ मे २०२६ रोजी दुपारी ३:३० ते सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेप्रकरणी अरुण गोपाळ पार्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने हे सर्वजण गावी आले होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लावण्या विजय पार्टे (वय १५ वर्षे, रा. साखर, चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८ वर्षे, रा. गिमवी, ता. गुहागर), विराज किशोर जाधव (वय १२ वर्षे, रा. गिमवी, ता. गुहागर) हे सर्वजण धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या डोहात पोहण्यासाठी आणि पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते.
परंतु, नदीच्या पात्रातील खोलीचा आणि पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने तिघेही एकापाठोपाठ एक खोल पाण्यात बुडू लागले. दुर्दैवाने, वेळेत मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. एकाच वेळी तिघांचा बुडून मृत्यू झाल्याने धामणंद, साखर आणि गुहागर परिसरावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश काळजाला घर पाडणारा होता.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सोमवार, १८ मे रोजी रात्री ११:४१ वाजता आमू. (अकस्मात मृत्यू) क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.