मिरकरवाडा बंदरात मत्स्य विभागाची धडक कारवाई पोलीस बंदोबस्तात जुन्या, मोडक्या नौका हटवण्यास सुरुवात
रत्नागिरी:
रत्नागिरीचे मुख्य केंद्र असलेल्या मिरकरवाडा जेट्टी आणि बंदर परिसराला मोकळा श्वास मिळवून देण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग अखेर ॲक्शन मोडमध्ये आला आहे. बंदरात जागा अडवून ठेवणाऱ्या आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत, मोडक्या व जुन्या नौकांवर आज प्रशासनाने थेट हातोडा चालवला. कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरकरवाडा बंदरात गेल्या अनेक महिन्यांपासून, किंबहुना काही वर्षांपासून अनेक नौका भंगार आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत पडून होत्या. या नौकांमुळे कार्यरत असलेल्या मच्छीमार नौकांना जेटीला लागण्यासाठी जागा उरली नव्हती.
मत्स्य विभागाने यापूर्वी संबंधित नौका मालकांना या जुन्या नौका स्वतःहून हटवण्यासाठी अनेकदा लेखी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या या नोटिसांना नौका मालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही की त्यांनी या नौका हटवण्याची तसदी घेतली नाही. अखेर, प्रशासनाने दिलेल्या मुदतीची वाट पाहून आज थेट जप्ती आणि निष्कासनाची मोहीम सुरू केली.
या कारवाईमुळे मिरकरवाडा बंदरातील स्थानिक आणि सक्रिय मच्छीमारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. स्थानिक मच्छीमार संघटना आणि व्यावसायिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे.
या मोडक्या नौकांमुळे आम्हाला आमच्या चालू नौका जेटीला लावताना प्रचंड त्रास व्हायचा. अनेकदा वाद आणि अपघातही घडायचे. तसेच, या भंगार नौकांमध्ये कचरा साठून आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. मत्स्य विभागाने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असून, यामुळे बंदरातील कोंडी फुटेल अशी प्रतिक्रिया स्थानिक मच्छीमारांची दिली आहे.
कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा वाद टाळण्यासाठी स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदरात तैनात करण्यात आला होता.
अत्यंत जड आणि पाण्यात अर्धवट बुडलेल्या नौका बाहेर काढण्यासाठी हायड्रा क्रेन आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
या मोकळ्या झालेल्या जागेचा वापर आता कार्यरत मच्छीमारांना जाळी सुकवण्यासाठी, मासळी उतरवण्यासाठी आणि नौकांच्या दुरुस्तीसाठी करता येणार आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, मिरकर वाडा बंदर हे शासकीय क्षेत्र असून याचा वापर केवळ सक्रिय मासेमारी व्यवसायासाठीच केला जावा. यापुढेही जर कोणी बंदराच्या आवारात अनधिकृतपणे जागा अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.
आज सुरू झालेली ही मोहीम जोपर्यंत पूर्ण बंदर परिसर स्वच्छ होत नाही, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
