‘ते’ जहाज जेटीवरून हलवले; जयगड बंदरात अडचण, न्यायालयाच्या परवानगीने समुद्रात नांगरले
रत्नागिरी, : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिरातीचे गॅसवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ते १५ ते २० दिवस जेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीला लावून ठेवण्यात आले होते; मात्र, यामुळे अन्य जहाजे येण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीने हे जहाज जेटीवरून हलवून खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत जहाजावरील माल उतरविण्यास मनाई करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू पोर्टच्या बाहेर हे जहाज जाता कामा नये, असेही आदेशात म्हटले आहे.
बनावट कागदपत्रे दाखवून माल वळवला गेल्याची धक्कादायक माहिती झांग युनियन इंटरनॅशनल यांनी दाखल केलेल्या तक्रारीतून उघड झाली. न्यायालयाने जहाजावर असलेला एलपीजी उतरवण्यास सक्त मनाई केली आहे. ते जयगड पोर्ट येथेच थांबवून ठेवण्याचे व भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये आणि त्यावरील माल उतरवला जाऊ नये, याची खात्री करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
या जहाजाचे दोन मालक आहेत; परंतु प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. इराकवरून गॅस भरून नेण्यासाठी ते भाडे कराराने घेतले होते. दोन कंपन्यांपैकी एका कंपनीला ते पाकिस्तानला न्यायचे होते; मात्र आयत्यावेळी या जहाजाचा मार्ग बदलल्याचे मूळ जहाज मालकाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी याबाबत तक्रार केली. लोड करण्यात आलेला माल पाकिस्तानसाठी जाणार होता; परंतु जयगड बंदरात जाण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याची माहिती चौकशीत पुढे आली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत हा निर्णय दिला होता. आता न्यायालयाची परवानगी घेऊन हे जहाज जेटीवरून जवळच खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे.
भारतातच गॅस खरेदीच्या हालचाली
जहाजामध्ये सुमारे १८०० टन एलपीजी गॅस आहे. युद्धजन्य परिस्थितीत गॅसचा भारताला तुटवडा भासत आहे. त्यामुळे भविष्यात या जहाजावरील गॅस भारतातच खरेदी करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्याचे समजते. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये भारताला हा गॅस मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.