आंबा-काजू पंचनाम्यांसाठी १९ पर्यंत मुदत
रत्नागिरी: जिल्ह्यात यावर्षी पडलेली कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे आंबा तसेच काजू पिकांचे नुकसान झाले आहे. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलली असून, नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. जिल्ह्यातील १,५६,९६० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्राचे अचूक मूल्यमापन करून २० मेपर्यंत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पीय मुख्यमंत्री अधिवेशनादरम्यान महोदयांनी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने १३ मे रोजी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करायचा आहे.
महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांमार्फत ग्रामस्तरावर संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने १९ मेपर्यंत आपल्या भागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत.