खेडमध्ये बंद फ्लॅट फोडून रोख रक्कम लंपास
खेड:
शहरातील स्वरूपनगर परिसरात असलेल्या नील हाईट्स अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी घरातील कपाट आणि इतर सामानाची उचकापाचक करून सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. या घटनेबाबत सचिन विनेरकर यांनी खेड पोलीस स्थानकात रितसर फिर्याद दाखल केली असून, चोरट्यांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकून नुकसान केल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
भरवस्तीतील उच्चभ्रू गृहसंकुलात ही चोरीची घटना घडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विनेरकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा पूर्ण केला असून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी आपले घर बंद करून बाहेर जाताना अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहनही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━
चिपळूणमध्ये हापूसची विक्री शेकडा दराने सुरू
चिपळूण
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात अवकाळी पावसाच्या सावटाखाली हापूस आंब्याची विक्री आता डझनाऐवजी थेट शेकडा दराने केली जात आहे. चिपळूणमधील गुहागर नाका आणि भेंडीनाका परिसरात सध्या चार ते सहा हजार रुपये शेकडा दराने हापूस आंब्याची विक्री होत असून, या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल या भागात होत आहे. तालुक्याच्या खाडीपट्टा भागातील आंबा मोठ्या प्रमाणावर येथे विक्रीसाठी येत असून रत्नागिरीतील पावसाळी वातावरणामुळे आंबा बागायतदारांनी विक्रीसाठी हे नाके आपले मुख्य केंद्र बनवले आहे.
सुटीच्या काळात गुहागरकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने परतीच्या प्रवासात हे पर्यटक आवर्जून थांबून आंब्याची खरेदी करत आहेत.
निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यावर्षी हापूस उत्पादनाला बसला असून संपूर्ण चिपळूण तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ दहा टक्के क्षेत्रावरच यावर्षी उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात तब्बल तीस टक्क्यांनी घट झाल्यामुळे सुरुवातीला बाजारपेठेत हापूसच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या हंगामात पाचशे ते सातशे रुपये डझनाने मिळणारा आंबा यंदा थेट पंधराशे ते सतराशे रुपये डझनापर्यंत पोहोचला होता. आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे दर कमी होतील असे वाटत असतानाच उत्पादनातील घटीमुळे दरात वाढ झाली होती, मात्र आता हे दर हळूहळू कमी होऊ लागले आहेत. सध्या अवकाळी पावसाची भीती असल्याने आंबा खराब होण्यापूर्वी त्याची विक्री करण्यासाठी बागायतदारांनी शेकडा दराचा पर्याय निवडला आहे.