धामणी नजीक रिक्षा-लक्झरी बसचा अपघात
चालकाच्या हयगयीमुळे प्रवासी जखमी, गुन्हा दाखल
संगमेश्वर: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर धामणी रेल्वे स्टेशनच्या मागे तांबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या लक्झरी बसला जोरदार धडक दिली. रिक्षा चालकाने डायव्हर्जन असलेल्या ठिकाणी बस येत असल्याचे पाहूनही वाहन न थांबवता भरधाव वेगात पुढे नेल्याने हा अपघात घडला. या अपघातात रिक्षा चालक आणि एक प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात १२ मे रोजी रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास घडला होता. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार सतीश शांताराम कोलगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
संशयित आरोपी रिक्षा चालक अभिजीत संजय गमरे (वय ३४, रा. गोळवळी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-08 BC 2035) मध्ये प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेकडून संगमेश्वरच्या दिशेने जात होता. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी रेल्वे स्टेशनच्या मागे, तांबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ हायवेला डायव्हर्जन आहे. या ठिकाणी आरोपी चालकाने तांबेवाडीकडे जाण्यासाठी यु-टर्न घेतला.
याच वेळी गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे लक्झरी बस (क्र. MH-01 EL 5495) येत होती. समोरून बस येत असल्याचे दिसत असतानाही, रिक्षा चालकाने डायव्हर्जनवर रिक्षा न थांबवता, आहे त्याच भरधाव वेगात पुढे नेली. स्वतःच्या आणि रिक्षातील प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही, त्याने हयगयीने आणि अविचाराने रिक्षा समोरून येणाऱ्या लक्झरी बसच्या उजव्या बाजूला ठोकली.
या भीषण अपघातात रिक्षा चालक अभिजीत संजय गमरे आणि रिक्षातील प्रवासी कुणाल सुरेंद्र कांबळे (वय २४, रा. ब्राम्हणवाडी, आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) हे दोघेही जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे किरकोळ व मोठे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार सतीश कोलगे यांनी मोटार अपघात रजि. नं. १०/२०२६ नुसार या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती १५ मे रोजी सायंकाळी ५:२५ वाजता रिक्षा चालक अभिजीत गमरे याच्याविरुद्ध अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.