मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे संयुक्त वार्षिक नेव्हल एनसीसी प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे दिनांक २९ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत संयुक्त वार्षिक एनसीसी प्रशिक्षण शिबिर – ३०१ उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात एकूण ३०० एनसीसी कॅडेट्सनी सहभाग नोंदवून विविध प्रशिक्षण उपक्रमांद्वारे शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रीय बांधिलकी व व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे आत्मसात केले.
या शिबिराचे कॅम्प कमांडंट म्हणून कमांडर रामानुज दीक्षित यांनी प्रभावी नेतृत्व केले. शिबिरासाठी ३ असोसिएट एनसीसी अधिकारी, ८ पीआय स्टाफ, १ गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर, १ शिप मॉडेलिंग इन्स्ट्रक्टर तसेच ८ नागरी कर्मचारी कार्यरत होते. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून शिबिराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
शिबिरादरम्यान कॅडेट्सना बोट पुलिंग, सेमाफोर प्रशिक्षण, सीमॅनशिप प्रशिक्षण, ड्रिल आदी प्रात्यक्षिक व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आयएनएस निलगिरी जहाजाच्या मॉडेलवर आधारित शिप मॉडेलिंग प्रशिक्षणाने कॅडेट्समध्ये नौदल विषयक तांत्रिक ज्ञानाबाबत विशेष उत्सुकता निर्माण केली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली. यामध्ये कृषी विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया, सायबर सुरक्षा, अग्निशमन, रस्ता सुरक्षा, ध्यान व योग यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एआरएएस अकॅडमीमार्फत विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच “ऑपरेशन सिंदूर” या विषयावरील सादरीकरणाद्वारे देशसेवा, राष्ट्रीय सुरक्षा व सशस्त्र दलांच्या कार्याची माहिती कॅडेट्सना देण्यात आली.
या प्रशिक्षण शिबिरासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील सुसज्ज निवास व्यवस्था, प्रशस्त वर्गखोल्या, आधुनिक सभागृह तसेच विस्तीर्ण क्रीडांगण व परेड मैदानाचा प्रभावी वापर करण्यात आला. महाविद्यालय प्रशासनाने ३०० कॅडेट्ससाठी स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध निवासाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली होती. विविध व्याख्याने, सादरीकरणे व प्रशिक्षण सत्रांसाठी सुसज्ज वर्गखोल्या आणि आधुनिक तंत्रसुविधांनी युक्त सभागृहाचा उपयोग करण्यात आला. तसेच ड्रिल, संचलन व मैदानी उपक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या प्रशस्त मैदानामुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनच्या उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे संपूर्ण शिबिराचे आयोजन अधिक यशस्वी ठरले.
शिबिराच्या सांगता समारंभामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतनकुमार जे. चौधरी यांनी शिबिरात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचारी व कॅडेट्सचे अभिनंदन केले. अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, संघभावना, साहस वृत्ती आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे म्हणून आसमंत फाउंडेशनचे श्री नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते.
संपूर्ण शिबिर काळात कॅडेट्समध्ये उत्साह, शिस्त आणि देशभक्तीचे वातावरण अनुभवास आले असून हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरले आहे.
